नमस्कार मित्रांनो!!!
आयुष्यचं GPS ज्योतिषशास्त्रच्या भाग १ मध्ये आपण बघितले की कशा प्रकारे ज्योतिषशास्त्र आपल्या आयुष्याला मार्ग दाखवून आपलं आयुष्य सोयिस्कर करू शकते. आता आपण ज्योतिषशास्त्राचे अजून काही फायदे बघूयात!
आरोग्याच्या तक्रारी या आयुष्यभर सुरू असतात. तारुण्याच्या धुंदीत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोही, पण शरीराला कधीतरी त्याचा सोस जाणवतोच. मग असलेला पैसा, ज्ञान या सर्व गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. आरोग्य हीच एकमेव संपत्ती असल्याची जाणीव होते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पण जर आपल्याला आधीच अंदाज असेल की आपल्याला आरोग्याच्या बाबतीत कोणत्या समस्या उद्भवू शकतात तर? ही आयुष्यात किती मोठं वरदान ठरेल! ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तिला शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित त्रास होऊ शकतो याबाबत माहिती मिळवू शकतो. म्हणजे, कोणत्या व्यक्तिला किडनी संबंधित विकार होऊ शकतात, हृदय, पोट असे विकार होऊ शकतात असे संकेत मिळवू शकतो. तसं जर असेल तर ती व्यक्ति त्याबाबतीत आधीच जागरूकता ठेऊन तो आजार होण्यापासून स्वतःला वाचवू शकते.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कुटुंबियांची आणि मित्रपरिवारची साथ आवश्यक असते. कधी संकटसमयी आधार म्हणून तर सुखाच्या क्षणात सोबती म्हणून आपल्याला माणसे हवी असतात. आपल्या माणसांशी जोडून राहणं, नातेसंबध टिकवणे हे फार महत्वाचं असतं. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण याकडे नकळतपणे दुर्लक्ष करत असतो. कधी-कधी विनाकारण गैरसमज करून घेऊन किंवा रागाच्या भरात दुखावली जातात. हे टाळणे आवश्यक असते. पत्रिकेत अशी काही ग्रहस्थिती निर्माण होते जेणेकरून असे प्रसंग उद्भवतात. आपल्याला जर आधीच अशा अपघाताच्या वेळेची माहिती असेल तर सय्यमाने वागू शकतो. खासकरून लग्न हा प्रसंग आहे ज्यावेळी दोन कुटुंब एकमेकांशी जोडले जात असतात. अशा वेळेस ज्योतिषशास्त्र महत्वाची भूमिका निभावू शकतं. लग्नंनातरही बर्याचदा पती-पत्नी संबंधात दुरावा निर्माण होतो. त्याचा परिणाम हा पूर्ण कुटुंबावर होत असतो. चूक कोणाचीही नसते पण केवळ परिस्थितिची देण म्हणून कुटुंब विभक्त होतात. जर यावर वेळीच उपाय केले आणि मनातील जळमटं साफ झाली तर कुटुंबातील वाद थांबवता येतात. या बाबतीत ज्योतिषशास्त्र एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतं.
आपण आयुष्याच्या या सर्व बाबींमध्ये ज्योतिषशास्त्र एखाद्या GPS प्रमाणे मार्गदर्शक म्हणून काम करू शकतं हे पाहिलं. पण हे साध्य कसं करता येतं याबाबत अनेकांना अनेक प्रश्न असतात. कदाचित काही अतिरेकी कथा ऐकल्याने यावरचा अतिविश्वास किंवा अविश्वास त्यांना वेगळ्या निष्कर्षापर्यन्त पोचवू शकतो. पण ज्योतिषशास्त्रात पत्रिकेचा आणि त्यातील ग्रहस्थितीचा अभ्यास केलेला असतो. प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा एक स्वभावधर्म आहे. तो पत्रिकेतील कोणत्या स्थानी असतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. कधी शुक्र तुमच्या करियरबद्दल सांगतो तर कधी गुरु ग्रह तुमच्या यशाचा कारक बनतो. कधी शनि महाराज तुम्हाला अडथळा बनत असतात तर कधी राहू-केतू तुमच्या वाईट स्थितीला जबाबदार असतात. या सर्व बाबतीत अनेक वर्षांचा अभ्यास बोलत असतो. जसं अवकाशात असलेला सॅटेलाइट पृथ्वीवर असलेल्या एका माणसाला योग्य रस्ता दाखवू शकतो तसाच एक ग्रह माणसाला चांगलं-वाईट फळ देऊ शकतो. येथे निरीक्षण आणि निष्कर्ष महत्वाचा ठरतो. आयुष्याचा दीर्घ प्रवास करत असताना आपल्याला जे शोधायचं आहे तेथे ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी किंवा कधी हरवलेपणाची स्थिती निर्माण झाली तर तेथेही ज्योतिषशास्त्र तुमची निश्चित मदत करू शकतं.