आपण योग्य करियर निवडीसाठी ज्योतिषशास्त्राची कश्याप्रकारे मदत घेऊ शकतो
प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. काहीही झालं तरी आपला मुलगा किंवा मुलगी आजच्या स्पर्धेच्या युगात मागे राहू नये यासाठी पालक वाट्टेल ते करायला तयार असतात. आपली अपूर्ण स्वप्ने आपल्या मुलांनी पूर्ण करावीत हे आई-वडिलांचं स्वप्नं असतंच. त्यासाठी मग आई-वडील आपल्या मुलांना त्यांनी नेमलेल्या मार्गावर चालायला लावत असतात. कधी शेजारच्या पांडेच्या मुलाला सरकारी नोकरी लागगल्यावर त्या कुटुंबाची झालेली भरभराट आई-वडिलांच्या डोळ्यासमोर असते तर कधी नात्यातील कोणीतरी एखाद्या टीव्ही शो मध्ये जाऊन सगळ्या नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र ठरलेलं त्यांनी पाहिलेलं असतं. मग हेच यश, हीच लोकप्रियता आपल्या मुलांच्या वाटेला यावी असं पालकांना वाटत असतं. त्यालाच यश समजून आई-वडील आपल्या मुलांना त्या मार्गावरील स्पर्धक बनवतात.
प्रत्येक कुटुंबाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. काही कुटुंबात आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं खूप महत्वाचं असतं. त्यासाठीचा भार घरातील पुढच्या पिढीच्या खांद्यावर असतो. आपल्या मुलांनी लवकर शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी असं एकच स्वप्नं घेऊन पालक जगत असतात.
यावरून एक गोष्ट सिद्ध होते की आपल्याकडे शिक्षण हा व्यक्तीगत आवडीचा आणि क्षमतेचा विषय नसून तो कौटुंबिक आकांक्षा व सामाजिक प्रतिष्ठेचा विषय आहे. मुलांना कोणत्या विषयात रस आहे, कोणत्या विषयात गती आहे आणि तो कोणत्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्यरत राहून यश प्राप्त करू शकतो याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. बर्याचदा कला क्षेत्रात आवड आणि गती असलेल्या मुलाला आई-वडिलांच्या हट्टामुळे म्हणा किंवा मित्रांच्या बरोबरीने अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यावं लागतं. पण त्या विषयात त्यांचा रस नसल्याने त्यांची प्रगति खुंटते. मग विनाकारण त्या क्षेत्रात तगून राहण्याचा अट्टहास सुरू होतो. दुर्दैवाने, स्वतःची आवड, स्वतःच्या मर्यादा आणि मुख्य म्हणजे स्वतःचे उपजत गुण माहीत नसल्याने त्या मुलाचं आणि सोबतच त्या कुटुंबाचं भवितव्य अधांतरी राहतं.
हे केवळ एक उदाहरण आहे. ज्यांचा स्वभाव कमी बोलण्याचा असतो त्यांना मार्केटिंग क्षेत्रात यश मिळवता येईल का? ज्यांचा स्वभाव चंचल आहे त्यांनी प्रचंड एकाग्रता लागणार्या शल्य चिकत्सक क्षेत्रात पाऊल टाकावं का?
यावरून एक स्पष्ट आहे की मुलांनी त्याच क्षेत्रात शिक्षण घ्यावं आणि करियर करावं ज्या क्षेत्रात त्यांना आवड असेल आणि गती असेल. येथे महत्व प्राप्त होतं ते Career Counseling अर्थात करियर समुपदेशन किंवा मार्गदर्शन! मुलांच्या अंगी असलेले उपजत गुण, त्यांची आवड, जन्मतः मिळालेले गुण-दोष आणि त्यांच्या एकंदरीत स्वभावगुणांच्या अनुषंगाने सोपे असणारे क्षेत्र शोधून त्यांना त्या मार्गावर वाटचाल करायला लावणे.
कुंडलीमध्ये विविध ग्रह असतात हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण त्या प्रत्येक ग्रहाचा एक कार्यकारण भाव असतो. कोणता ग्रह कोणत्या स्थानी असल्यावर त्याचा मनुष्यावर कसा परिणाम होतो हेसुद्धा निश्चित असतं. जसा माणसाचा एक गुणधर्म असतो तसा ग्रहांचाही असतो. कार्यक्षेत्राच्या बाबतीत सांगायचं तर जसा शुक्र ग्रह कला, साहित्य या क्षेत्रांशी निगडीत आहे. गुरु ग्रह बुद्धीशी निगडीत कार्यक्षेत्राशी संबधित आहे. हे ग्रह आपल्या पत्रिकेत कोणत्या स्थानी आहेत त्यानुसार आपली आवड, आपला स्वभाव, आपल्या क्षमता, आपल्या मर्यादा ठरत असतात. याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्या मुलाने-मुलीने करियरसाठी कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे हे ठरवल्यास पुढील वाटचाल सोपी होते.
काही वेळा सर्व काही योग्य असूनही यशप्राप्ती होत नसते. त्याला ग्रहांची ‘महादशा’ कारणीभूत असते. याअनुसार, ग्रहांच्या स्थितीचा त्या व्यक्तीवर असा काही परिणाम होत असतो की तो विशिष्ट काळ त्या व्यक्तीसाठी खडतर असतो आणि त्या कालावधीसाठी हवं असलेलं प्राप्त करणं कठीण असतं.
आजच्या जगात कार्यक्षेत्र म्हणून आपल्यासमोर अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यातील नेमका कोणता आपल्यासाठी उचित आहे हे या समुपदेशनातून जाणून घेता येईल. ग्रहांच्या दशेवरुन योग्य दिशा जाणून घेणे हे काम आपल्याला करायचं असतं.
आपण जेथे कार्यरत असतो आणि तेथे यश मिळत नसेल तर आपण निवडलेला प्रांत चुकीचा आहे असं नंतर वाटू शकतं. मग पुन्हा परिस्थितीच सुरुवातीपासून अवलोकन केलं जातं आणि शेवटी ज्ञात होतं की आपण जे करतोय त्यासाठी बनलेलोच नाहीत. मग सगळी चक्र उलटी फिरवावीशी वाटतात. कधी कधी इतका उशीर झालेला असतो की परतीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. हे सगळं टाळण्यासाठी आधी आपण स्वतःबद्दल जाणून घेऊन योग्य दिशेने वाटचाल सुरू केली तर आपल्या आयुष्यचं गलबत चुकीच्या मार्गाने जाणार नाही.