Vastu and Marriage
वास्तुशास्त्रा प्रमाणे वातावरणात पंचमहाभुतांचे अस्तित्व हे मुक्त स्वरुपात असते. परंतु जेव्हा त्यांना चार भिंतीमध्ये बंदिस्त केले जाते त्या वेळेस त्यांचे आठ दिशांबरोबर संबंध प्रस्थापित होतात. चार मुख्य दिशा, चार उपदिशा या बरोबर आकाशाकडील दिशा म्हणजे अनंत ही नववी अधर म्हणजे भूमी ही दहावी दिशा. अशा दहा दिशांचा विचार वास्तुशास्त्रात केला गेला आहे. वास्तुरचने नुसार दिशांचा, पंचतत्त्वाचा, भूमीच्या उर्जेचा परिणाम वास्तुत राहणार्या व्यक्तींवर होत असतो. वास्तुशास्त्राच्या मुळ ग्रंथामध्ये भूमी व भूमी ऊर्जा यांचा सर्वाधिक विचार केलेला असून प्रत्येक ग्रंथात एक तृतिअंश लेखन वास्तूसाठी भूमीची निवड कशी करायची यावरच आहे. भूमीची शुभता अशुभता भूमीतून प्रस्फुटीत होणार्या ऊर्जेवर अवलंबुन असते. भूमीच्या ऊर्जेचा दुरगामी परिणाम मनुष्य जीवनावर झाल्याचे दिसून येते. भूमी बरोबरच अष्टदिशा (काही ग्रंथाप्रमाणे सोळा दिशा), पंचतत्त्व या ऊर्जेचा परिणाम हा त्या वास्तुत राहणार्या व्यक्तीवर होतो. यास्तव मनुष्य ज्या वास्तुत राहतो त्या वास्तुतील ऊर्जेचे परिणाम त्याच्या विचारांवर प्रभाव टाकतात. विचारातून भावनांची निमिर्ती होते, भावनेतून कृती आणि कृतीतून परिणाम समोर येतात. अशाप्रकारे अप्रत्यक्षरित्या आपण राहत असलेली वास्तु आपल्या यशापयसास कारणीभूत ठरते.
वास्तुशास्त्रात जीवनातील प्रत्येक अंगाचा विचार केलेला असल्याने विवाह आणि त्यात वास्तु शास्त्रामुळे येणारे अडथळे याचा विचारही साहजिकच केला गेला. वास्तुशास्त्रानुसार योग्य वयात विवाह होण्यासाठी वास्तुतील चारही उपदिशा व उत्तर दिशा दोष विरहीत असणे जरुरी आहे. जन्म कुंडली प्रमाणे योग्य वयात विवाह योग दर्शवलेला असूनही वास्तुमुळे विवाह ठरण्यास अडथळे येत असेल तर, वास्तुतील ईशान्य, अग्नेय, नैऋत्य, वायव्य व उत्तर दिशांमधील दोष कारणीभूत ठरतात. या पाचही दिशाच्या गुणधर्मांचा व कारकत्वाचा सविस्तर विचार करणे गरजेचे आहे.
ईशान्य-पंचतत्वा मधील जल तत्वाची येथे अधिकता येत असल्याने स्वच्छता, विचारांमध्ये स्पष्टता, नविन कल्पना देणारी, मनाला ग्रहणशील अवस्थेत घेऊन जाणारी आणि जीवनाबद्दल मोठा दृष्टिकोन देणारी ही दिशा आहे. ईश्वराचे अधिष्ठाण याच दिशेला असते. या दिशेतील दोष हा जीवनाबद्दल संकुचित विचार व असुरक्षितता निर्माण करतो. प्रत्येक संधीला अडथळा समजून पुढे जाण्याची भिती वाटायला लागते. यातून दैनदीन गरजेच्या गोष्टी जमवण्यास लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडते, त्यामुळे विवाहाचा विचारच केला जात नाही आणि इतरांनी आग्रह केल्यास पुढे जाण्यास भिती वाटते. विचार स्पष्ट नसल्याने जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे यामध्येच गोधळ असल्याने कुठल्याही त्रुटी शोधल्या जातात. साधारतणत: या दिशेत असलेली अस्वच्छता, शौचालय, अडगळ किंवा अवजड सामान, उंच टेकडी, उंच बांधकाम, कचराकुंडी असल्यास या दिशेत दोष निर्माण होतो.
अग्नेय- विवाह व वैवाहीक सौख्य यावर अधिपत्य गाजवणार्या शुक्राची ही दिशा आहे. अग्नी सुरक्षिततेचे प्रतीक असून जीवनात जोश व उत्साह यांचे प्रतिनिधीत्त्व करते. अग्नी उर्जा रुपांतरीत करुन मार्गक्रमित होत असल्याने ज्या ठिकाणी आकर्षण असते तिथे अग्नी तत्व असते. समाजामध्ये यश व विशिष्ट ओळख निर्माण करणारी ही दिशा असून आत्मविश्वास देण्याचे कार्य करीत असल्याने या दिशेतील दोष हा घरातील व्यक्तीना विनाकरण अपयश देतो. स्वत:ची ओळख निर्माण होत नाही. प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. आत्मविश्वास कमी होऊन जीवन भयग्रस्त होते. अग्नेय दिशेतील मोठी वाढ ही स्वत: बद्दल मोठ्या प्रमाणावर अहंकार निर्माण करते. समाजातील स्थान, प्रतिष्ठा याला जास्त महत्व दिले जाते. शुक्र ग्रहाची दिशा बिघडल्यामुळे शुक्राच्या गुणधर्माणा ‘स्पार्क’ न मिळाल्याने भावी जोडीदारा प्रती आकर्षण निर्माण होत नाही. सौंदर्य व कामवासना या बाबतीत भ्रामक कल्पना बाळगल्याने नकार येतो अथवा दिला जातो. या दिशेस विहीर, तलाव, पाण्याची टाकी, खड्डा, उतार असल्यास तसेच ही दिशा कट झाल्यास किंवा मोठ्या प्रमाणावर वाढल्यास अग्येय दिशेत दोष निर्माण होतो.
नैऋत्य- वास्तुदेवता मंडळातील पितृ या देवतेचा स्थान असलेली ही दिशा. जीवनामध्ये वंश विस्ताराचे, विवाह सारखे मंगल कार्य घडऊन आणण्याची जबाबदारी पितृकडे असते. या बरोबर पृथ्वी तत्वाची ही दिशा आहे. धैर्य, संतुलन, खंबिरपणा, स्थिरता, विकसित व्यक्तीमत्त्व देण्याचे काम ही दिशा करते. नवीन नाते संबध निर्माण करण्याबरोबरच रक्ताच्या नात्यात घनिष्ठता निर्माण करणारी ही दिशा आहे. सफल आणि समृद्ध जीवनासाठी जे केले पाहीजे त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देणारी ही दिशा आहे. यर दिशेतील दोष हा नविन नाते निर्माण होण्यासाठी पोषक वातावरणाला बाधक ठरतो. जुन्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये अस्थिरता येते. घरातील लोकांमध्ये आळस, कंटाळा, शक्तीहीनता वाढते. परीवारत तणाव असल्याने नविन नाते जोडण्यास भिती वाटते. परिवाराकडून या दृष्टीने प्रयत्न केले जात नाही. नोकरी, व्यवसायात अस्थिरता असल्याने विवाहासाठी जोडीदार मिळण्यात अडचणी येतात.
नैऋत्य दिशेस खड्डा, विहीर, जमीनीखालील पाण्याची टाकी, सेप्टीक टँक इत्यादी असणे तसेच ही दिशा वाढलेली असणे अथवा कट झालेली असणे, नैऋत्य दिशेस उतार अथवा टेरेस, या पैकी काहीही असल्यास नैऋत्य दिशा बिघडून त्या दिशेत दोष उत्पन्न होतात.
वायव्य-मनाची चंचलता दर्शवणार्या चंद्र ग्रहाची तर कायम अस्थिर असलेल्या वायू तत्वाची ही दिशा आहे. प्रसिद्धी अथवा कुप्रसिद्धी पसरवणे हे या दिशेचे गुणधर्म आहेत. संतुलित वायुतत्त्व हे वृद्धीकारक आहे. याचा संबध गतीशी असल्याने सशक्त संबध प्रस्थापित करुन मोठ्या यशामध्ये परावर्तित करण्याचे कार्य यादिशे मार्फत होते. शरीर, मनाला आनंद देणार्या बाबींचा विचार याच दिशेवरुन केला जातो. ही दिशा संबंध निर्माण करणारी दिशा असल्याने, संपर्क वाढून नविन नाते जोडण्यासाठी फारच महत्वाची मानली जाते. समाजामध्ये असलेली पत हे या दिशेच्या शुभ-अशुभत्वावर अवलंबुन असते. विवहा ठरुन मोडणे यात याच दिशेच्या गुणधर्माचा अधिक वाटा असतो. तसेच या दिशेस असलेल्या वायू तत्त्वाच्या गुणधर्मानुसार येथे ठेवलेली कुठलीही वस्तू कायम स्वरुपी स्थिर राहत नाही. वास्तुशास्त्रा नुसार या दिशेस पाहुण्याची खोली किंवा विवाह योग्य मुलींची खोली ठेवण्यास सुचवले जाते. या दिशेतील दोष संपर्क प्रणाली कमकुवत करते, नविन नाते जोडण्यात अपयश येते, अपेक्षांची पूर्तता होत नाही. मन अस्थिर झाल्याने योग्य निर्णय घेता येत नाही. चुकीच्या व्यक्ती संपर्कात येऊन त्याचे पुढे विवाहात रुपांतर होऊ शकत नाही. प्रत्तेक स्थळाप्रती असमाधानी वृत्ती वाढल्याने गाडी पुढे सरकत नाही. वायव्य दिशा कट झाल्यास किंवा वाढल्यास, नैऋत्य दिशेपेक्षा उंच असल्यास, वायव्य दिशेस विहीर असल्यास किंवा टेरेस असल्यास या दिशेत दोष असतो.
उत्तर दिशा- वास्तुशास्त्रानुसार धन कारक म्हणून या दिशेकडे पाहिले जाते. घरात पैसा कोणत्या मार्गाने येणार आहे,याचे उत्तर ही दिशा दर्शर्वित असते परंतु धना बरोबरच नवीन संधी निर्माण करण्याचे दायित्त्व उत्तर दिशेकडे आहे. उत्तर दिशा ऊर्जेची उगम दिशा असल्याने प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधण्यास मदतगार ठरते. या दिशेत दोष असल्यास चांगली संधी उपलब्ध होत नाही, त्यामुळे स्वत:ला सिद्ध करता येत नाही. अर्थातच योग्य स्थळ सांगून येत नाही, सर्व काही ठिक असून समोरुन प्रस्ताव येत नाही अथवा नाकारला जातो. काहीतरी कारण सांगून चालढकल केली जाते. दुसर्या ठिकाणी लग्न जुळल्याचा निरोप येतो. अशा रितीने सुयोग्य स्थळ हातचे निघून जाते. उत्तर दिशा बंद असणे, उत्तरेस टेकडी किंवा चढ अथवा शौचालय असणे किंवा सेप्टीक टँक असणे, उंच बांधकाम, स्वयंपाकगृह असणे इत्यादी रचना ही उत्तर दिशेत दोष निर्माण करतात.
अशा प्रकारे आपल्या वास्तुतील दोष अप्रत्यक्षपणे घरात मंगल कार्य घडवण्यास अडथळा निर्माण करु शकते. यासाठी योग्य वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन अडथळा दूर केल्यास घरात मंगलकार्य विनासायास पार पडते.
डॉ. अभय अगस्ते
संचालक ,
ज्योतिष-वास्तु सायन्स इन्स्टिट्युट ऍन्ड रिसर्च सेंटर